इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलीवूडमधील कलाकारांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत असते. त्यांच्या आयुष्यातील चांगल्या किंवा वाईट अशा कोणत्याही गोष्टीवर चाहत्यांचे लक्ष असते. संवेदनशील अभिनेता म्हणून ओळख असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या वैयक्तिक आयुष्यातही सध्या उलथापालथ सुरू आहे. त्याच्या पत्नीने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर नवाजुद्दीन अडचणीत आला आहे. आता या दोघांमध्ये मुलांच्या कस्टडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवाजुद्दीन याने आपली मुले कुठे आहेत, त्यांचा पत्ता मिळावा, यासाठी कोर्टात याचिका केली आहे. उच्च न्यायालयात त्याने हेबियस कॉर्पस दाखल केली आहे. मात्र, न्यायालयाने आपापसातील वाद सामंजस्याने सोडवण्यास सांगितले आहे. तुमच्या या वादात मुलांचे आणि वडिलांचे नाते हरवू नये, असेही न्यायालयाने म्हटले आहे. नवाजुद्दीन आणि त्याची पत्नी झेनब यांच्या वादाची झळ मुलांना बसते आहे. मुले कुठे आहेत याची कोणतीही माहिती नवाजुद्दीनला नाही. मुले शाळेत जात नसल्याचा मेल त्याला शाळेतून आल्याचे नवाजुद्दीनचे वकील प्रदीप थोरात यांनी न्यायालयाला सांगितले.
न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी सुरू होती. नवाजुद्दीनला देखील मुलांच्या शिक्षणाची आणि भविष्याची काळजी आहे. त्यामुळे तुम्ही एकमेकांशी बोला, वडील आणि मुलांमधील संवाद अबाधित राहील असे पहा अशा सूचना न्यायालयाने नवाजुद्दीन आणि झेनब या दोघांना केल्या आहेत.
Actor Nawazuddin Siddiqui and Wife Family Court