इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादी व्यक्ती एखाद्या क्षेत्रात यशस्वी असेल तर त्या व्यक्तीच्या मुलाने किंवा मुलीने रूढार्थाने तोच मार्ग अवलंबावा, असा एक सर्वसाधारण समज आहे. त्यामुळेच आपण डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि इंजिनिअरचा मुलगा इंजिनिअर होईल असं मानलं जातं. आता यात काही प्रमाणात बदल झाला आहे. मात्र, तरीही वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासोबतच दुसऱ्या क्षेत्राकडे वळणाऱ्या व्यक्तीकडे भुवया उंचावून पाहिले जाते. हे एवढं सगळं सांगण्याचं कारण म्हणजे एका प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेत्याच्या मुलाने वेगळी वाट चोखाळली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मराठीसह बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. महेश यांना त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांचीही उत्तम साथ मिळते आहे. आता त्यांच्या पाठोपाठ त्यांची मुले सई, सत्या आणि गौरी मांजरेकरही कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करू पहात आहेत. महेश यांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटामधून सत्या मांजरेकर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
याशिवाय महेश यांचा मुलगा सत्या याने एक नवा व्यवसाय सुरू केला आहे. सत्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या फोटोमधून याबाबत माहिती दिली. सत्याने स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे. ‘सुका सुखी’ असं या हॉटेलचं नाव आहे. सत्याला नव्या व्यवसायासाठी सगळे शुभेच्छा देत आहेत.
‘सुका सुखी’ फ्रॉम द मांजरेकर्स किचन असा याचा एक वेगळाच लोगो बनवण्यात आला आहे. नावावरून कळले असेलच, या हॉटेलमध्ये तुम्हाला सुक्या मच्छीचा आस्वाद सगळ्यांना घेता येणार आहे. सत्याची ही नवी सुरुवात खरंच कौतुकास्पद आहे. शिवाय दुसरीकडे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’साठी तो विशेष मेहनत घेत आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये सत्या मांजरेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. वडिलांबरोबर काम करण्यास उत्सुक असलेला सत्या सध्या त्या भूमिकेच्या तयारीत आहे. जीममध्ये वर्कआऊट करतानाचे अनेक व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
Actor Director Mahesh Manjrekar Son Satya Started New Business