नाशिक – आठ लाख रुपयाची लाच प्रकरणात फरार असलेल्या जिल्हा परिषदेच्या वादग्रस्त लाचखोर माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर- झनकर यांची ठाणे लाचलुचप्रतिबंधक विभागाच्या पथकाने घराची झडती घेतल्यानंतर वीर यांच्या संपत्तीची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैशाली वीर यांच्या यांच्या नावावर मुरबाड, कल्याण रोड, नाशिक शिवाजीनगर, कल्याण गंधारे आणि नाशिक गंगापूर रोड अशा चार ठिकाणी फ्लॅट असल्याचे समोर आले आहे. त्याचप्रमाणे सिन्नर व कल्याणमध्ये अनेक ठिकाणी जमीन आहे. त्याचप्रमाणे ४० हजारांची रोकड, होंडा सिटी कार, दुचाकी त्यांच्या नावे आहे. वेगवेगळ्या बँकांचे पासबुकही एसीबीला झडतीत हाती लागले आहे. याच प्रकरणातील दुसरा आरोपी वाहन चालक ज्ञानेश्वर येवले याच्या यांच्याकडेही पत्नी आणि मुलांच्या नावाने वेगवेगळ्या बँकांचे पासबुकसह दोन गाड्यांचे आरसीबुक मिळाले आहेत. प्राथमिक शिक्षक दशपुते यांच्या नावे नाशिक येथे ते राहत असलेला टू बीएचकेचा फ्लॅट, दुचाकी आणि तीन बँक खाती असल्याचे समोर आले आहे.
ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी त्यांच्यासह दोन जणांवर लाच प्रकरणी कारवाई केली होती. पण, महिला असल्याने सुर्यास्तानंतर अटत करता येत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना दिराच्या ताब्यात दिले होते. सकाळी आठ वाजता त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्या हजर राहिल्या नाही. मात्र दुपारी अडीच वाजेपर्यंत न्यायालयात वैशाली वीर हजर न झाल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे बुधवारी न्यायालयात सांगितले. या प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान वैशाली वीर या अटकपूर्व जामीन घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात गेल्याचे बोलले जात आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहे.