अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राहुरी तालुक्यातील वारागांव नांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. वृषाली तुळशीराम सूर्यवंशी- कोरडे यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १० हजार रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. डॉ वृषाली या वैद्यकिय अधिकारी, वर्ग २(गट अ) प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे तर तक्रारदार या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नोकरीस आहे. तक्रारदार यांच्याकडून माहे ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ या दोन महिन्यांचा कामावर आधारित मोबदला व प्रोत्साहन भत्ता व ऑक्टोबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता मिळणे करिता तक्रारदार यांनी अगोदर ४ हजार ५०० रुपये दिले. त्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी तक्रारदार यांनी पुन्हा आरोपी लोकसेविका यांची भेट घेऊन बिलासंदर्भात विचारणा केली. त्यानंतर पुन्हा बिलाचे निम्मे रकमेची मागणी केली व तडजोड अंती १० हजार रुपयाची तरी द्यावे लागतील असे सांगितले. तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. ६ फेब्रुवारी रोजी पंचासमक्ष केलेल्या लाच मागणी पडताळणी मध्ये आरोपी लोकसेविका यांनी तक्रारदार यांचे कडे १० हजार रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बारागांव नांदूर येथे लाचेचा सापळा आयोजित केला असता, आरोपी लोकसेविका यांनी त्यांचे केबीन मध्ये तक्रारदार यांचे कडुन १० हजार रुपयाची लाच स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक ला.प्र. वि. हरिष खेडकर, पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के, चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांच्या पथकाने केली.