नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा ) : बाललैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करणार्या तसेच पॉक्सो कायद्याबद्दल माहिती देणार्या एकपात्री नाटकाचे आयोजन नाशिक येथे विश्वास ग्रुप तर्फे करण्यात आले आहे. बालकांचे होणारे लैंगिक शोषण, या प्रकरणातल्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी म्हणून तयार करण्यात आलेला ‘पोक्सो’ कायदा याबाबत जनजागृती करणारे अभया हे नाटक आहे. लहान मुलांवर अत्याचार होण्याच्या घटना आपल्या भोवताली घडत असतात. पण, त्या चिमुकल्यांना अर्थातच हे कळत नाही, अशा वेळी पोक्सो कायद्याविषयी पालकांना माहिती असणे गरजेचे आहे. पोलिस, वैद्यकीय आणि न्याय व्यवस्था या तीन व्यवस्थांचा वेध या नाटकात आहे. नाटकाचे संकल्पना, लेखन व दिग्दर्शन मीना नाईक यांचे आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, कळसूत्री, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा जलालपुर (नाशिक) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास गार्डन शेजारी) ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे मंगळवार, २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सदर नाटकाचा प्रयोग संपन्न होणार आहे. नाटकाचा कालावधी १ तास आहे. विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास जयदेव ठाकूर व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओच्या समन्वयक ऋचिता ठाकूर आयोजक असुन विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे सचिव विनायक रानडे यांची संकल्पना आहे.
सदर कार्यक्रमासाठी विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा जलालपूर, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास टर्फ, ग्रंथ तुमच्या दारी यांचे सहकार्य लाभले आहे. तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वास जयदेव ठाकूर, विनायक रानडे, ऋचिता ठाकूर यांनी केले आहे.