मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महागडी पुस्तके जर आपणाला शंभर- दीडशे रुपयात मिळाली तर आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. नव्याने स्थापन झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असणाऱ्या अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) या संस्थेने महापुरुषांचे विचार सर्वदूर पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला असून, ८५ टक्के सवलतीत ही पुस्तके आर्टीच्या कार्यालयात उपलब्ध असल्याची माहिती आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी दिली.
देशातील अनेक महापुरुषांनी पुस्तकांच्या माध्यमातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी बार्टीचे महासंचालक श्री. वारे आणि निबंधक इंदिरा आस्वार यांच्या संकल्पनेतून आर्टी संस्थेने महापुरुषांच्या पुस्तकांवर ८५ टक्के सवलत देण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे.
भारताचे संविधान, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, अण्णा भाऊ साठे यांचे खंड आणि त्यांच्यावर लिहिलेली मराठी, इंग्रजी भाषेतील पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. सामाजिक, राजकीय, खासगी, शासकीय आणि शैक्षणिक संस्था तसेच प्रत्येकांनी संग्रहित ठेवावे, असे हे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत.
पुस्तकाची मूळ किंमत व कंसात सवलतीत दर पुढील प्रमाणे
भारताचे संविधान ४५० रुपये (६३), शूद्र पूर्वी कोण होते? ३०० (४५), बुद्ध आणि त्यांचा धम्म ४०० (६०), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र चांगदेव खैरमोडे सेट ४ हजार (६००), समग्र आंबेडकर चरित्र बो. सी. कांबळे सेट २५०० (३७५), फकिरा १६० (२४), फकिरा इंग्रजी अनुवाद २५०० (३७५), अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान ४८० (७२), राजर्षी शाहू रयतेच्या राज्याचे चित्रमय चरित्र १५०० (२२५), साहित्यसम्राट १५० (२३), स्वराज्य ते स्वातंत्र्य आणि समता १२० (१८), कर्तृत्व आणि व्यक्ति महत्त्व. ११०० (१६५). एकूण किंमत ११ हजार ५२६ रुपये किमतीची पुस्तके सवलतीच्या दरात १७३० रुपयात उपलब्ध होणार आहेत.
नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यात ८० हजार रुपयांच्या पुस्तकांची विक्री झाली असल्याची माहिती श्री. वारे यांनी दिली आहे. आर्टी कार्यालयाचा पत्ता बी- 201/ 202, 2 रा मजला, ‘बी’ विंग, अर्जून सेंटर, स्टेशन रोड, गोवंडी (ईस्ट) येथे पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गोवंडी स्टेशनपासून पूर्वेकडे 5 मिनिटांच्या अंतरावर आर्टी ही संस्था आहे.