नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिल्ली विधानसभेनंतर आता महापालिकेवर आम आदमी पार्टीने विजय प्राप्त केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या तब्बल १५ वर्षांच्या सत्तेला अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आपने सुरुंग लावला आहे. भाजपने १५ केंद्रीय मंत्री आणि ७ राज्यांचे मुख्यमंत्री महापालिका प्रचारात उतरविले होते. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. आपने निर्विवाद वर्चस्व मिळविले.
दिल्ली महापालिकेत आता आम आदमी पार्टीचा महापौर असणार आहे. ४ डिसेंबर रोजी महापालिका निवडणुकीचे मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज झाली. त्यात आपने मोठे यश मिळविले आहे. दिल्ली आणि पंजाब विधानसभेनंतर महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपने लक्षणीय यश प्राप्त केले आहे. दिल्ली महापालिकेच्या एकूण २५० जागा आहेत. आपने १३४ जागा जिंकून बहुमत प्राप्त केले आहे. भाजपला १०४ तर काँग्रेसला ९ जागी यश मिळाले आहे.
आपचे अरविंद केजरीवाल यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने हरेक प्रकारे प्रयत्न केले. गुजरात आणि हिमाचल प्रदेशची निवडणूकही याच काळात झाली. मात्र, केजरीवाल यांनी दिल्ली, गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये सभा आणि रोड शो घेतले. दिल्लीत आपला अडचणीत आणण्याचा एकही प्रयत्न भाजप सोडत नाही. दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन सध्या तुरुंगात आहेत. त्याचेही भांडवल भाजपने केले. पण, त्याचा फारसा फायदा झाला नाही.
यापूर्वी दिल्लीत उत्तर, दक्षिण आणि पूर्व अशा तीन महापालिका होत्या. मात्र, या महापालिकांचे एकत्रिकरण करण्यात आले. त्यामुळे दिल्ली ही सर्वात मोठी महापालिका आहे. आणि पहिल्यांदाच या सर्वात मोठ्या महापालिकेची निवडणूक झाली. परिणामी त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निकालानंतर आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, या भव्य विजयाबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आता आपण सर्वांनी मिळून दिल्ली स्वच्छ आणि सुंदर बनवायची आहे.
CM @ArvindKejriwal's Victory Speech from AAP HQ after winning Delhi MCD Elections | LIVE #MCDMeinBhiKejriwal https://t.co/9UQ2wWJLSI
— AAP (@AamAadmiParty) December 7, 2022
Aam Aadmi Party Delhi MCD Election Victory
Arvind Kejriwal BJP Politics Election