इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ‘हेराफेरी’ मधून बाहेर पडल्याच्या वृत्तामुळे अक्षय कुमार सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याचे चाहतेसुद्धा बरेच नाराज आहेत. यंदा अक्षय कुमारचे एका पाठोपाठ एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटल्याने त्याला सोशल मीडियावर बरंच ट्रोल केलं जात आहे. मध्यंतरी त्याने या ट्रोलिंगला उत्तरदेखील देण्याचा प्रयत्न केला होता.
सौदीमध्ये सुरू असलेल्या ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अक्षयने नुकतीच हजेरी लावली होती. या सोहळ्यात त्याने त्याच्या आगामी चित्रपटाच्या विषयाबद्दल भाष्य केलं आहे. अक्षय लवकरच लैंगिक शिक्षणासारख्या गंभीर मुद्द्याला चित्रपटाच्या माध्यमातून हात घालणार आहे. या महोत्सवात अक्षयने याबद्दल स्पष्टीकरण दिलं.
मॉडरेटर कलीम आफताबशी संवाद साधताना अक्षय म्हणाला, “हा खूप महत्त्वाचा विषय आहे, बऱ्याच ठिकाणी याची दखल घेतली जात नाही. शाळेत सगळे विषय शिकवले जातात. पण अत्यंत महत्त्वाच्या अशा या विषयाकडे आपले दुर्लक्ष होते आहे. जगातील प्रत्येक शाळेत शिकवला गेला पाहिजे एवढा हा महत्त्वाचा विषय आहे. आता यावर मी चित्रपट काढणार आहे, फक्त तो प्रदर्शित व्हायला जास्त वेळ लागणार आहे. पण तो माझा सर्वोत्तम चित्रपट असेल.”
अक्षय म्हणतो, सामाजिक संदेश देणारे चित्रपट करायला मला फार आवडतं. व्यावसायिक चित्रपटाप्रमाणे त्याला यश मिळत नाही, पण असा चित्रपट करून माझ्या मनाला समाधान मिळतं, असं फार महत्त्वाचं विधान अक्षयने केलं आहे. याआधीही ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ आणि ‘पॅडमॅन’ सारखे सामाजिक विषयांवरील चित्रपट त्याने केले आहेत. अक्षयच्या या प्रयत्नांचे प्रेक्षकांनी देखील कौतुक केले आहे. आता अक्षय ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटात झळकणार आहे शिवाय तो एका तमिळ चित्रपटाच्या रिमेकवरही काम करणार आहे.
Actor Akshay Kumar New Film Announcement
Bollywood Entertainment