मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मानेची शस्त्रक्रीया झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रथमच एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तब्बल दीड महिन्यांच्या कालावधीनंतर मुख्यमंत्री प्रत्यक्ष एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिन उद्या (२६ जानेवारी) रोजी संपन्न होत आहे. या निमित्ताने कफ परेड मैदानावर राज्य सरकारच्यावतीने शासकीय सोहळा आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. मुखअयमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
साधारण अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मानेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने ते सध्या विश्रांती व उपचार घेत होते. याचदरम्यान त्यांनी मंत्रिमंडळ बैठक, राज्य टास्क फोर्स बैठकीसह अन्य महत्त्वाच्या बैठकांना व कार्यक्रमांना ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली. त्यात मुख्यमंत्र्यांचा ऑनलाईन बोलतानाचा फोटोच समोर आला होता. आतापर्यंत त्यांचा संपूर्ण फोटो जाहीर झालेला नव्हता. मात्र, दोन दिवसांपूर्वी त्यांचा संपूर्ण फोटो सर्वांसमोर आला. निमित्त होते ते शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब आणि नेताजी यांना वंदन केले. या अभिवादनाचा हा फोटो होता. त्यात त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून आले.
विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तब्ब्येतीवरुन चांगलीच टीका गेल्या काही दिवसांपासून केली आहे. मुख्यमंत्रीपदाचा पदभार तात्पुरता कुणाकडे तरी द्यावा, रश्मी ठाकरे यांना संधी द्यावी या आणि अशा कितीतरी टीका करण्यात आल्या आहेत. मात्र, आता मुख्यमंत्र्यांचा पूर्ण फोटो समोर आल्याने सर्व चर्चा आणि अफवांना पूर्णविराम मिळाला. त्यातच मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. लवकरच राज्याच्या कानाकोपऱ्यात जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर आता सर्वप्रथम ते प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते राज्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे.