मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिन्नर तालुक्यातील गणेश सावंत याच्या हत्येप्रकरणी आरोपी मोनिका विठ्ठल भांगरे हिला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने भांगरे हिला जामीन मंजूर केला आहे.
अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९/०४/२०१७ रोजी सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक गुन्हा घडला होता. आरोपी मोनिका विठ्ठल भांगरे व इतर आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून गणेश सावंत याला चाकूने भोसकून जीवेठार मारले. तशा स्वरूपाची फिर्याद सिन्नर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयाने सप्टेंबर २०२१ मध्ये आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सदर शिक्षेला आव्हान देण्यासाठी आरोपी मोनिका भांगरे यांनी अॅडव्होकेट अनिकेत निकम यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यात नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्यात आले. तसेच शिक्षा प्रलंबित असताना जामिनाची मागणी केली.
मुंबई उच्च न्यायालयात द्विसदसीय खंडपीठाचे न्यायमूर्ती श्री संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती श्री नितीन बोरकर यांच्यापुढे अॅड निकम यांनी युक्तिवाद केला. अॅड निकम यांनी कोर्टाला असे निदर्शनास आणून दिले की, सरकार पक्ष मार्फत खटला चालवताना दोष सिद्धीसाठी एकूण २१ साक्षीदार तपासण्यात आले. सदर साक्षीदारांच्या पुराव्यांमध्ये असणारी विभिन्नता आणि विसंगती तसेच सदर पुरावा कायद्याला अनुसरून नाही, असे निकम यांनी कोर्टाला पटवून दिले. तसेच संपूर्ण खटला हा प्रत्यक्षदर्शींनी साक्षीदारांच्या पुराव्यांवर आधारित आहे. अशा परिस्थितीत सरकारी पक्षाने मूळ कायद्याच्या तत्वानुसार प्रत्यक्षदर्शनी साक्षीदारांच्या पुरावा सत्र न्यायालयापुढे शाबित केली नाही. आणि मे. सत्र न्यायालयाने अयोग्यरित्या प्रत्यक्षदर्शनी साक्षीदार, पुरावा ग्राह्य धरून अयोग्यरित्या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती श्री नितीन बोरकर या द्विसदसीय खंडपीठाने सदर युक्तिवाद ग्राह्य धरला. त्यानंतर आरोपी मोनिका विठ्ठल भांगरे यांना आव्हानच्या अंतिम सुनावणी होईपर्यंत जामीन मंजूर केला.