इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने हाहाकार माजवला असून संपूर्ण मानव जातीला वेठीस धरले आहे. त्यातच कोरोनाच्या नवनवीन विषाणू प्रकारांमुळे अनेक देश भयभीत झालेले आहेत. या विषाणूवर मात करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जगभरातील शास्त्रज्ञ, आरोग्य तज्ज्ञ आणि वैद्यकीय अभ्यासक रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. त्यातून नवनवीन संशोधन समोर येत आहे.
सध्या ओमिक्रॉनचा धोका भारतासह अनेक देशात वाढला असून त्याबाबत आणखी एक नवीन संशोधन समोर आले आहेत. हवेत विषाणू किती टिकतो? यावरील एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना विषाणू हवेत आल्यानंतर केवळ 20 मिनिटांच्या कालावधीत संक्रमित होण्याची क्षमता 90 टक्के गमावतो. तसेच, हा विषाणू पहिल्या 5 सेकंदात त्याची अर्धी शक्ती गमावतो. हवेतील आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साइडची कमतरता हे यामागचे कारण संशोधकांनी दिले आहे.
कमी संसर्गजन्य होतो
एका नवीन अभ्यासानुसार, हवेच्या संपर्कात आल्यानंतर 20 मिनिटांच्या आत कोरोना विषाणू 90 टक्के कमी संसर्गजन्य बनतो आणि हवेच्या संपर्कात आल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांत संसर्ग होण्याची क्षमता गमावतो. ब्रिस्टल विद्यापीठाच्या एरोसोल संशोधन केंद्राने प्रकाशित केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष असे आहेत की, कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी फेस मास्क घालणे आणि सामाजिक अंतर राखणे याच्या महत्त्वाची गोष्ट आहे.
संसर्ग कसा पसरतो?
कोविड-19 विषाणू हवेतून पसरतो. जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे कण श्वास घेऊन जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होऊ शकतात.
कमजोर कसा होतो?
संशोधकांच्या मते, हवा विषाणूला कोरडे करते. तसेच हवेतील कार्बन डायऑक्साइडच्या कमतरतेमुळे विषाणूची पीएच पातळी वाढते. यामुळे, विषाणू काही मिनिटांत संसर्ग पसरवण्याची क्षमता गमावतो.
शरीरात जिवंत कसा राहतो?
शास्त्रज्ञांचा दावा आहे की, कोविड-19 जास्त प्रमाणात आर्द्रता आणि कार्बन डायऑक्साइड असलेल्या वातावरणात दीर्घकाळ टिकतो. कारण या दोन्ही गोष्टी आपल्या फुफ्फुसात मिळतात. त्यामुळे आपल्या शरीरात तो सहज टिकून राहू शकतो.
मास्क व अंतर आवश्यक
या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, व्हायरसची संसर्ग पसरवण्याची क्षमता हवेत आल्यानंतर काही मिनिटांतच संपते. असे झाले तरच मास्क लावून आणि शारीरिक अंतर राखून आपण कोरोनाला हरवू शकतो.
(सूचना: या बातमीत नमूद केलेली माहिती केवळ सामान्य ज्ञानाच्या उद्देशाने दिल्या आहेत. काही प्रश्न किंवा समस्या असल्यास नेहमी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )