नाशिक – वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिकला आलेल्या मावस सासूचा गळा दाबून तसेच विषाची बाटली दाखवून जावयाने बलात्कार केल्याची घटना भारतनगर परिसरात घडल्याचे उघडकीस आले आहे. वासनांध जावयाने नाशिकमध्ये दोनदा तर अमरावतीमध्ये एकदा धाक दाखवत कुकर्म केले. पीडित महिलेने अमरावतीतील नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आशु वाणी (वय ३५, रा. भारतनगर) असे त्या नराधम जावयाचे नाव असून तो मुळचा कोयाळी (ता. रिसोड, जि. वाशिम) येथील आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, वडिलांच्या अंत्यविधीसाठी नाशिकला आल्यानंतर या कुकर्माला प्रारंभ झाला. साडीचोळी करण्यासाठी संशयित पीडित मावस सासूला २७ सप्टेंबरला भारतनगरमधील घरी घेऊन आला होता. मध्यरात्री २.३० वाजता पीडित झोपलेली असता त्याने गळा दाबला. यामुळे अचानक जागे झालेल्या पीडितेला विषाची बाटली दाखवून जबरी संभोग केला. यावेळी त्याने पीडितेचे फोटोही काढले. पीडितेला एक अॉक्टोबरला नाशिकमधील एका हॉटेलात नेऊन फोटो दाखवून धमकवण्यात आले. तिथे पुन्हा सोबत जबरी संभोग करण्यात आला.
पीडिता यानंतर अमरावतीला परतली. वासनांध जावयाने १० ऑक्टोबरला तिचे घर गाठले. पीडिता घरी एकटीच असल्याचे पाहून तसेच अश्लील फोटो व विषाची बाटली दाखवून पुन्हा एकदा कुकर्म करण्यात आले. वारंवार होत असलेल्या या घटनेने भेदरलेल्या पीडितेने अखेर सात डिसेंबरला अमरावतीतील नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना मावस जावयाकडून होत असलेल्या कुकर्माची माहिती दिली. या तक्रारीन्वये संशयिताविरुद्ध भादंवि कायदा कलम ३७६(२)(एन), २(एफ), ५०६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या कुकर्माची सुरुवात नाशिकमधील भारतनगरमधील घरात झाली असल्याने अमरावती पोलिसांनी हा गुन्हा मुंबई नाका पोलिस ठाण्यात वर्ग केला. उपनिरीक्षक चेतन श्रीवंत तपास करत असून संशयित जावयाचा शोध सुरु आहे.