नाशिक : विनयभंगाचा गुन्हा मागे घेत नाही तसेच तडीपारी कारवाईत साक्ष नोंदविल्याने पाच जणांच्या टोळक्याने महिलेसह तिच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना त्र्यंबकरोडवरील गोल्फक्लब झोपडपट्टी भागात घडली. या घटनेत लाठ्या काठ्या,दगड व धारदार चाकूचा वापर करण्यात आल्याने कुटुंबिय जखमी झाले असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहिती नुसार संतोष तुकाराम सोनवणे,अक्षय प्रकाश शिंदे,गणेश उर्फ राजपाल नरेंद्र झाल्टे,चंद्रकांत भरत वाघमारे व भरत नामदेव वाघमारे (रा.सर्व गोल्फक्लब झोपडपट्टी) अशी संशयीत हल्लेखोरांची नावे आहेत. यातील भरत वाघमारे वगळता अन्य चौघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरूध्द विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.याप्रकरणी ३० वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. संशयीत सोनवणे याने पीडितेचा विनयभंग केला असून याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे. तसेच पीडितेच्या दोघा भावांनी चंद्रकांत वाघमारे याच्या तडिपार कारवाईत जबाब नोंदविल्याने संतप्त टोळक्याने हा हल्ला केला. विनयभंगाचा गुन्हा मागे घेत नाही तोच तडिपार कारवाईत जबाब नोंदविल्याने टोळक्याने मंगळवारी (दि.२१) रात्री त्र्यंबकरोडवरील सार्वजनिक शौचालयाजवळ कुटुंबियास गाठून हा जीवघेणा हल्ला केला. गुन्हा मागे घ्यावा तसेच जबाब का नोंदविला या कारणातून कुरापत काढून टोळक्याने पीडितेसह तिचे आई – वडिल,भाऊ भावजयी व अन्य नातेवाईकांवर अचानक हल्ला केला. लाठ्या काठ्यांसह दगडाने कुटुंबियांस बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एकाने धारदार चाकूने कुटुंबियावर वार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास निरीक्षक चंद्रकांत आहिरे करीत आहेत.