जॉर्डन – गेल्या दीड वर्षात कोरानामुळे जगभरात लाखो रुग्णांचा मृत्यू झाला. याला कोण जबाबदार आहे? याबद्दल विविध देशांमध्ये वेगवेगळे प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र याप्रकरणी कोणाला कठोर शिक्षा झाल्याची फारसे दिसून आले नाही. मात्र काही मोजक्या देशात अत्यंत कठोर कायदे असून या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जॉर्डनच्या न्यायालयाने रविवार, दि. ५ रोजी १० कोरोना रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी सरकारी रुग्णालयाच्या संचालकाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. वास्तविक, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचे न्यायालयाने मान्य केले, मात्र यासाठी रुग्णालय संचालकांना जबाबदार धरत निकाल दिला.
कोर्टाने सॉल्ट स्टेट हॉस्पिटलमधील रूग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रूग्णालयाचे संचालक अब्देल रझाक अल-खश्मान आणि चार सहकारी दोषी आढळले, यामध्ये ऑक्सिजन सपोर्ट काढून टाकल्यानंतर कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला. मात्र, संचालक १० दिवसांच्या आत न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकतात.
जॉर्डनमधील रुग्णालयात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले आणि सरकारचा तीव्र निषेध केला. आरोग्यमंत्री नाझीर ओबेदत यांनीही या प्रकरणाचा राजीनामा दिला होता. या दुर्घटनेनंतर किंग अब्दुल्ला द्वितीय यांनी सरकारी रुग्णालयाला भेट दिली. जिथे शेकडो नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
भारतात कधी होणार
भारतात हलगर्जीपणामुळे रुग्णांचा मृत्यू होत असल्याच्या घटना वारंवार उघडकीस येतात. मग, ऑक्सिजन गळती असो आयसीयुला लागलेली आग असो की हॉस्पिटलमधील अन्य प्रकार. मात्र, यासंदर्भात कुणावरही कठोर कारवाई होताना दिसत नाही. अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला जात असल्याचे प्रकार घडत आहेत.