मुरादाबाद (उत्तर प्रदेश) – व्हॉटसअॅपद्वारे बिनबोभाटपणे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश उत्तर प्रदेश पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या चौकशीत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. लोकप्रिय अॅप असलेल्या व्हॉटसअअॅपचा वापर या गैरकृत्यात करण्यात आला आहे. तसेच, अनेकांना यात गंडविण्यात आल्याचेही तपासात पुढे आले आहे.
आंतरराज्यीय सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कोलकाता येथील राणा शेर उर्फ तारिक दास या गुंडाला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी दिल्लीत बसून सेक्स रॅकेटशी संबंधित एजंटांना मुली पुरवायचा. त्याचे जाळे उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणामध्ये पसरले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण उत्तर भारतात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पोलिसांच्या संयुक्त पथकाने दोन महिलांसह पाच जणांचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर याच टोळीतील तीन महिलांसह आणखी सहा आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीच्या मदतीने पोलीस तपास करत होते. या तपासा दरम्यान दिल्लीत बसलेला तरुण ही टोळी चालवत असल्याचे निष्पन्न झाले. मोबाईल लोकेशनद्वारे पोलिसांनी कोलकाता येथील राणा शेख उर्फ तारिक दास याला अटक केली.
राणा शेख हा रोहिणी दिल्लीतील विजय विहार येथे राहत होता, तेथून तो व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मदतीने आपले सेक्स रॅकेट चालवत होता. छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून दोन मोबाईल फोन, दोन बँक पासबुक, पॅनकार्ड, आधार कार्ड आदी साहित्य जप्त केले आहे. आरोपी राणा शेख याला कोर्टात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, आतापर्यंतच्या तपासात असे आढळून आले आहे की राणा शेखचे नेटवर्क राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये पसरले आहे. या राज्यांतील विविध जिल्ह्यांत त्याचे १०० हून अधिक एजंट असल्याची माहिती मिळाली आहे. या आरोपींचे मुरादाबादमध्ये १७ दलाल आहेत आणि बरेलीमध्येही तेवढेच दलाल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राणा शेख हा पश्चिम बंगालसह इतर ठिकाणांहून मुलींना बोलावून तो अल्प मुदतीसाठी मुलींना त्याच्या एजंटला विकत होता. राणा शेख हा एका मुलीला तीन ते चार दिवस देण्यासाठी ३० हजार रुपये घेत होता. राणा शेख एक व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून आणि त्यात एजंट जोडून त्याच ग्रुपमध्ये मुलींचे फोटो टाकत होता. यानंतर एजंट हे ग्राहकाला दाखवून मुलीला पसंती देत आणि त्याच ग्रुपमध्ये किंमत, वेळ आदीही ठरविले जात होते, त्यानंतर त्याच्या किंवा पत्नीच्या खात्यात ऑनलाइन पेमेंट करून आरोपी राणा शेख मुलींना एजंटकडे पाठवत. जिथून मुली ग्राहकांपर्यंत पोहोचवल्या जात.