मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अचानक आज मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. त्यांच्या समवेत मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि राज्य सरकारचे महाधिवक्ता हे सुद्धा उपस्थित होते. गेल्या २ ते ३ दिवसांपासून उच्च न्यायालयाच्या आवारात लसीकरण मोहिम सुरू आहे. त्याचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा हा दौरा असल्याचे सांगितले जात आहे. साधारण २० मिनिटांचा हा दौरा पूर्वनियोजित होता असेही मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसेच, लसीकरणाबाबत माहिती घेतली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या भेटीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जात आहे. कारण, कोरोना संकटात विविध बाबींच्या पूर्ततेवरुन अनेकांनी मुंबई उच्च न्यायालयात सरकारविरोधात धाव घेतली आहे. या सर्व याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी घेऊन निकाल देत आहे.