नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुन्हेगारी कारवायांमुळे हद्दपारीची कारवाई केलेली असतांनाही शहरात वावर ठेवणा-या दोघा तडीपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. या कारवाईने शहरातील तडिपाराचां वावर चर्चेत आला असून ही कारवाई कागदावरच असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी पंचवटी आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ऋषीकेश रत्नाकर धात्रक (रा.यशोमती सोसा.शक्तीनगर,हिरावाडी) व आदित्य रामदास पिंगळे (२१ रा.पिंगळेमळा,मखमलाबाद) अशी अटक करण्यात आलेल्या तडिपारांची नावे आहेत. धात्रक यास शहर आणि जिह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. मात्र त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस त्याच्या मागावर असतांना मंगळवारी (दि.२१) दुपारी तो आपल्या घरात मिळून आला. याबाबत अंमलदार गोरक्ष साबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार नांदुर्डीकर करीत आहेत.
तर पिंगळे हा बुधवारी (दि.२२) रात्री आपल्या राहत्या घरात आल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी पोलीस शिपाई पंकज चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार फुलपगारे करीत आहेत.