नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागात मद्याच्या नशेत पतीने बेदम मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झाला. या हत्येनंतर पतीने पत्नीचा पाय घसरून पडल्याचा बनाव केला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघड झाले. गंगापूर पोलिस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करण्यात आली आहे. पीनू सोमनाथ पवार (४४ रा. साती आसरा कॉलनी जवळ,पाझर तलाव झोपडपट्टी मुळ रा.सुरगाणा) असे अटक केलेल्या संशयित पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिरा पिनू पवार (४१) या महिलेस सोमवारी रात्री संशयिताने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तिला वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले होते. घरात चक्कर येवून पडल्याचा संशयिताने बनाव केला होता. सकाळी शवविच्छेदनात तिला बेदम मारहाण करण्यात आल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आल्याने याप्रकरणी पतीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री मद्याच्या नशेत पती पीनू याचा पत्नीसोबत वाद झाला होता. या वादानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. फावड्याच्या लाकडी दांड्याने तिच्या छातीवर व पोटावर बेदम मारहाण करण्यात आल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी मयत महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तिचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी अधिक तपास करुन संशयित पती पीनू याला ताब्यात घेतले. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रिजाय शेख यांच्या सूचनेनुसार पथक पुढील तपास करीत आहे.