नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द येथे बापासह आजोबाच्या डोक्यात लोखंडी तवा मारून जीवे ठार मारणा-या दोघा भावांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एका भावाची निर्दोष मुक्तता केली आहे. राहूल ज्ञानेश्वर फोकणे (२५) व प्रमोद ज्ञानेश्वर फोकणे (२३ रा.दोघे घोटी खुर्द.ता. इगतपुरी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून संशयित नितीन फोकणे याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
घोटी खुर्द येथे फोकणे यांच्या घरात ही घटना घडली होती. या घटनेत दोघा आरोपींचे वडिल ज्ञानेश्वर काशिनाथ फोकणे आणि त्यांचे वडिल काशिनाथ फोकणे यांची हत्या केली होती. याप्रकरणी वाडिव-हे पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येवून तिन्ही भावांना अटक करण्यात आली होती. या गुह्याचा तपास निरीक्षक व्ही.पी.जाधव यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. हा खटला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समोर चालला. सरकारपक्षाच्या वतीने अॅड. शिरीष कडवे, अॅड.योगेश कापसे व अॅड.दीपशिखा भिडे यांनी दहा साक्षीदार तपासले असता न्यायालयाने फिर्यादी,साक्षीदार व पंच यांची साक्ष व तपासी अंमलदारांनी सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून संशयित नितीन फोकणे याची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली तर दोघा आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप व तीन हजार रूपयांची शिक्षा सुनावली.
हत्या करण्यामागे हे होते कारण
वडिल ज्ञानेश्वर फोकणे यांचे बाहेर अनैतिक संबध असल्याने ते आईला त्रास देतात तसेच कर्जबाजारीपणामुळे वडिलोपार्जीत शेत जमिन,जागा व हॉटेल त्यांनी विक्रीस काढल्याची माहिती राहूल, प्रमोद आणि नितीन फोकणे या मुलांना मिळाली होती. तसेच अनैतिक संबधामुळे कर्जबाजारी झालेल्या वडिलांना आजोबा पाठीशी घालत असल्याचा संशय या मुलांना होता. त्यातून हे दुहेरी हत्याकांड घडले होते. संगणमत करीत तिघांनी २९ नोव्हेंबर रोजी मृत बापलेक झोपी गेल्याची संधी साधत आरोपीनी त्यांच्या डोक्यात लोखंडी तव्याने घाव घालत दोघांचा निर्घृण खून केला होता. घटनेनंतर प्रमोद फोकणे याने गुह्यात वापरलेले हत्यार दारणा धरणात फेकून दिले होते. तर नितीन फोकणे आपल्या दोन्ही भावांच्या मदतीला धावून जात त्यांची रक्ताने माखलेली कपडे जंगलात लपवून पुरावा नष्ट केला होता.