नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात तीन घरफोडीच्या घटना घडल्या आहे. या घरफोडीत चोरट्यांनी सहा लाखाहून अधिक ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव, म्हसरूळ व गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पहिली घटना संभाजी चौकात घडली. अमोद रमेश वैशंपायन (रा.प्रणव बंगला,आर.सी.बाफना ज्वेलर्स पाठीमागे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वैशंपायन कुटुंबिय गेल्या २९ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याच्या खिडकीचे गज तोडून घरातील कपाटात ठेवलेली एक लाखाची रोकड, सोन्या चांदीचे दागिणे व टायटन घड्याळ असा सुमारे २ लाख ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
दुसरी घटना मखमलाबाद गावात घडली. चोरट्यांनी हार्डवेअरचे दुकान फोडून सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. मनोज नारायण काकड (रा.हनुमाननगर,जुना चांदशी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. काकड यांचे मातोरीरोड भागात ओम हार्डवेअर नावाचे दुकान आहे. मंगळवारी (दि.३) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाच्या पाठीमागील दरवाजाचे कुलूप तोडून ४० हजार रूपये किमतीचे पितळी मटेरियल त्यात पिस्टल गॅलन नट,नेपल नौझल,एलबो,वॉल,बॉल व सीसीटिव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भुसारे करीत आहेत. तिसरी घटना आडगाव शिवारात घडली. येथे राहणा-या संध्या संदिप ठाकूर (रा.पदमावती रो हाऊस चौंडेश्वरी नगर,रूख्मिनी लॉन्स मागे) या बुधवारी (दि.४) दुपारी अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली अडीच लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ३ लाख २९ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.