मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मागील वर्षी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते, कालांतराने शिंदे -फडणविस सरकार आले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर याच महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायम आहेत. मात्र आता
त्यांच्यासमोर पक्ष महत्त्वाचा की जबाबदारी महत्त्वाची? अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्या रुपाली पाटील यांच्याविरोधात काही संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत. त्या तक्रारींची दखल घेऊन रुपाली पाटील यांच्यावर कारवाई केली जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी रुपाली चाकणकर यांना आपल्याच पक्षातील एका सहकारी महिला नेत्यावर कारवाई करावी लागणार आहे. चाकणकर यांच्या नियुक्तीला सात महिने झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या त्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केली. त्याशिवाय अल्पसंख्याक आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ व अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडी सरकारने नियुक्ती केली होती. आता सरकार बदलले तरीही या महामंडळ आयोगावर काम करणाऱ्या व्यक्तींनी त्या पदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे काही जाणकारांचे मत आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्याने राज्यातील उद्धव तथा महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर माेठ्या घडामाेडी हाेऊन राज्यात नवे भारतीय जनता पक्ष-शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले. हा सत्ताबदल झाला असला तरी घटनात्मक दर्जा असलेली महामंडळे व आयोगावरील जुन्या सरकारने केलेल्या नियुक्त्या कायम राहिल्या आहेत. वास्तविक नव्या सरकारमध्ये फक्त मुख्यमंत्र्यांना वाटले तरच ते यात बदल करू शकतात; मात्र आकस दिसेल या कारणाने तसे होण्याची शक्यता कमी आहे. मात्र आता नवाच पेच निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे प्रकरणातील पीडितेचे फेसबुक लाईव्ह केल्याप्रकरणी महिला आयोग राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्यावर कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे यासंदर्भात काही सामाजिक संघटनांच्या तक्रारी आल्या आहेत. एखाद्या पीडितेची ओळख मिडियासमोर आणणे चुकीचे आहे. यासंदर्भात पोलीस महासंचालकांना महिला आयोग पत्र लिहिणार आहे, अशी प्रतिक्रिया चाकणकर यांनी दिली. त्यातच राहुल शेवाळे प्रकरणी पोलिसांवर केंद्र आणि राज्य सरकारचा दबाव आहे. या प्रकरणी महिला आयोगाने पोलिसांना आतापर्यंत अनेक पत्रे लिहिली आहेत, अशी माहिती चाकणकर यांनी दिली. आता या प्रकरणाचे पुढे काय होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
State Women Commission Rupali Chakankar To be or Not To be
Chairman NCP Rupali Patil MP Rahul Shewale