नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जेलरोड भागात दहशत माजविणा-या टोळक्याने एकास जीवे मारण्याची धमकी देत बळजबरीने अंगझडती घेवून त्याच्या खिशातील रोकड काढून पोबारा केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उपनगर पाच संशयितांना अटक केली असून दोन जण फरार झाले आहे. नरेंश लोंढे, स्वामी गोरे, निखील भालेराव, पवन फासगे व हरिष राक्षे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून करण धोत्रे आणि निलेश चव्हाण हे संशयित अद्याप फरार आहेत. याप्रकरणी यश महेश दंडगव्हाळ (२१ रा.श्रीगणेश अपा.करंजकर नगर,दसक) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. दंडगव्हाळ रविवारी विरसावरकरनगर येथील निलमणी पार्क भागातून पायी जात असतांना संशयित टोळके या ठिकाणी हातात लाठ्या काठ्या घेवून शिवीगाळ करीत दहशत माजवित होते. रस्त्यावर उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांच्या त्यांनी काचा फोडल्या याचवेळी रस्त्याने पायी जाणा-या दंडगव्हाळ यांची वाट अडवित संशयितांनी त्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने अंगझडती घेवून त्याच्या खिशातील ७०० रूपयांची रोकड काढून पोबारा केला. या घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना हुडकून काढले असून त्यांचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक पंकज भालेराव करीत आहेत.