नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळया भागात दोन घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. यातील एक घरफोडी भरदिवसा झाली आहे. घरफोडीचा समावेश आहे. पहिली घटना औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात घडली. तुकाराम कारभारी जाधव (रा.चामुंडानगर,अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. जाधव कुटुंबिय ९ ते १३ नोव्हेंबर दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील २२ हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ७२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत. तर दुसरी घटना जुने नाशिक परिसरातील चौकमंडईत भागात घडली. येथे राहणा-या शबाना समिर सय्यद (रा.दिपक सलून मागे) या सोमवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास अल्पशा कामासाठी घराबाहेर पडल्या असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील ठेवलेले तीन हजाराची रोकड, अलंकार व मोबाईल असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.