निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
देवळा तालुक्यातील ग्रामीण भागातील खुंटेवाडी मुळगाव असलेल्या प्रथमेश विकास भामरे या विद्यार्थ्याने इंडियन नेव्हल अकॅडमी (आय.एन.ए.) या सागरी शिक्षण देणाऱ्या भारतीय नौदल संस्थेत आपल्या हुशारी व जिद्दीने प्रवेश मिळविला आहे. या संस्थेत देशभरातून ३६ विद्यार्थ्यांना बी- टेक ची पदवी प्रदान करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून अवघे चार विद्यार्थीची निवड झाली आहे. त्यात प्रथमेश याचाही समावेश आहे.
आयएनए संस्थेने बंगळुरू येथे घेतलेल्या परीक्षेत हे चौघे विद्यार्थी यश मिळवू शकले आहेत. यापैकीच एक असलेला प्रथमेश हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील एकमेव विद्यार्थी आहे. इतर तिघे मुंबई ,पुणे व संभाजीनगर या शहरातील आहेत. खुंटेवाडी येथील प्राथमिक शिक्षक विकास भामरे यांचा प्रथमेश हा मुलगा आहे. आई राजश्री सोनवणे- भामरे व वडील विकास भामरे हे दोघे जिल्हा परिषद शिक्षक असल्याने लहानपणापासूनच शिक्षणात हुशार असलेल्या प्रथमेशने पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतूनच केले आहे. मालेगाव तालुक्यातील खडकी येथे प्रथमेशचे आई वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक- शिक्षिका असून प्रथमेशने ११वी आणि १२वी सायन्सचे शिक्षण मालेगाव येथे केले आहे.
केरळ मधील “इजिमाला” या शहरात प्रथमेशला पुढील शिक्षण मिळणार आहे. पुढील चार वर्षे केंद्र शासनाच्या या संस्थेत प्रथमेश बी-टेकची पदवी घेणार आहे . या संस्थेत शिक्षण घेतल्यानंतर भारतीय नौदलात मोठ्या नोकरीची प्रथमेशला संधी मिळणार आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत पुढे जात प्रथमेशने हे भरघोस यश संपादन केले आहे. प्रथमेशच्या या यश्याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Prathamesh Bhamre Success Story Navy Selection
Deola Khuntewadi Nashik