इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – इंस्टास्टार गौतमी पाटील सध्या चांगलीच चर्चेत आहे. सांगलीत एका सत्कार समारंभात तिच्या लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला सांगलीकरांची झुंबड उडाली. गर्दी रोखण्यात आयोजकांना अपयश आलं. आणि आलेल्या प्रेक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेवर चढत तेथील कौलं तोडली. शिवाय या कार्यक्रमात एका शिक्षकानेही लावणीवर ठेका धरला. यामुळे तो शिक्षकही टीकेचा धनी झाला. या कार्यक्रमात झालेल्या गोंधळानंतर गौतमी पाटील हिने एक पत्रकार परिषद घेत झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे.
सांगलीतील कार्यक्रमात माझ्याकडून काही चुका झाल्या. यापुढे अशा चुका होणार नाहीत, याची मी काळजी घेईन, असं गौतमी सांगते. माझ्याकडून लावणी सादर करताना काही अश्लील नृत्य झालं असले, तर मी माफी मागते, असंही ती म्हणाली. यावेळी गौतमीने आपली जीवनकहाणी लोकांसमोर मांडली.
आपण या क्षेत्रात कसे आलो, याबद्दलही तिने यावेळी सांगितले. गौतमी मूळची खानदेशकडची. धुळे जिल्ह्यातलं शिंदखेडा हे गौतमीच्या आईचं गाव. तिचं बालपण फारच कष्टात गेलं. गौतमी पोटात असतानाच वडिलांनी तिच्या आईला सोडलं. त्यामुळे तेंव्हापासून ती आपल्या आईसोबतच आहे. आणि पर्यायाने आपल्या आजोळी राहते. तिच्या आजोबांनी तिला सांभाळलं. वडिलांनी आईला सोडल्याने तिने लहानपणापासून वडिलांना पाहिलेच नव्हते. ती आठवीत असताना तिने पहिल्यांदा आपल्या वडिलांना पाहिल्याचं गौतमी म्हणते. त्यांना पण पुण्यात आणण्याचा प्रयत्न तिच्या मामाने केला. पण तो काही यशस्वी झाला नाही. तिचे वडील दारू पिऊन आईला मारहाण करायचे. यामुळे शेवटी गौतमी आणि तिच्या आईने वडिलांना सोडलं.
गौतमीला वाढवण्यासाठी तसेच पोटापाण्याची सोय म्हणून तिच्या आईला काही न काही काम करणे भाग होते. त्यामुळे तिची आई बिस्लेरीच्या कंपनीत कामाला लागली. पण, तरीही आयुष्य सुरळीत झालं नाही. आईचा अपघात झाला आणि तिचं काम गेलं. तेंव्हा गौतमी शिकत होती. पण आईचं काम गेल्याने तिला शिक्षणही सोडावं लागलं. त्याचवेळेस गौतमी नृत्याचं देखील प्रशिक्षण घेत होती. ते मात्र तिने सुरू ठेवलं. तिचे नृत्य पाहून तुमची मुलगी ऑर्केस्ट्रात काम करेल का, अशी विचारणा तिच्या आईला करण्यात आली होती. आईने होकार दिल्यावर गौतमीच्या कामाला सुरुवात झाली. आकलूज लावणी महोत्सव हा तिचा पहिला शो, तो देखील बॅक डान्सर म्हणून केलेला. तिथूनच तिची सुरुवात झाली. त्यानंतर तिने विविध कार्यक्रम केले. अल्पावधीत ती लोकप्रिय झाली. सोशल मिडियावरही ती सक्रिय असते. संधी मिळाली तर चित्रपटात काम करायला आवडेल, असंही गौतमी म्हणते.
Instastar Gautami Patil Apologies Dance