मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – “तू आधी कुंकू लाव मगच बोलतो”, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराशी बोलताना केले आहे. त्यामुळे भिडे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांच्या वक्तव्यावर टिका केली जात आहे. तसेच, त्यांच्या या वक्तव्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने त्यांना नोटिस बजावली आहे. याप्रकरणी भिडे यांना आता खुलासा करावा लागणार आहे.
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकरांशी संवाद साधला. या संवादादरम्यान, साम टीव्हीच्या महिला पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी तिला “तू आधी कुंकू लाव मगच बोलतो. प्रत्येक स्त्री ही भारतमातेचं रुप आहे, अन् आमची भारतमाता विधवा नाही.” असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यांच्या वक्तव्याची आता महिला आयोगानंही दखल घेतली असून त्यांना खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
तसेच भिडेंच्या वक्तव्यामुळे त्या महिलेचा आणि पत्रकारितेचाही अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंचा निषेध आहे, अशी प्रतिक्रिया महिला आयोगाकडून देण्यात आली आहे. याआधीही महिलांना हीन समजणारी, तुच्छतादर्शक वक्तव्य त्यांनी वारंवार केली आहेत. त्यांची मनोवृत्ती यातून दिसून येते,” असे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्यांनी ट्वीटद्वारे आपली प्रतिक्रियाही दिली. भिडेंना आत्मचिंतनाची गरज आहेच. टिकली ही महिलेच्या कर्तृत्वाच मोजमाप नाही. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तातडीने खुलासा करावा, असंही त्या म्हणाल्या. संभाजी भिडे त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडून खुलासा करण्याबाबत नोटीसही पाठवण्यात आली आहे.
टिकली लाव तरच तूझ्याशी बोलतो – संभाजी भिडे. टिकली हे सौंदर्यसाधन आहे, त्याशिवाय तिला टिकली एवढीही किंमत नाही. महिलांसाठी शाळा, केशवपन, विधवा विवाह सारख्या गोष्टींची सुरूवात ज्या पुरोगामी महाराष्ट्रात झाली तिथे टिकलीवरून एखाद्या महिलेचा अपमान करणे हे निषेधार्ह आहे #टिकली #साम pic.twitter.com/4Ywz74vasd
— Deepa Kadam (@DeepaKadam03) November 2, 2022
Shivpratishthan Sambhaji Bhide Controversial Statement Notice
Maharashtra Women Commission