इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क –
साऊथची राणी आणि लाखो नव्हे तर करोडो दिलांची धडकन असलेली अभिनेत्री समंथा हिचे देशभरात अनेक चाहते आहेत. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलं आहे. त्यामुळे तिचे कोट्यवधी चाहते आहेत. तर नुकताच प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटातील ‘ऊ अंटावा’ हे गाणे आजही धुमाकूळ घालत आहे. समंथाच्या चाहत्यांसाठी काळजी वाढवणारी एक बातमी आहे. आपल्याला मायोसिटिस हा दुर्मिळ आजार झाल्याचं समंथाने सांगितलं आहे. समंथाने रुग्णालयातील तिचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिलीय आहे.
समंथाने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून रुग्णालयातील फोटो शेअर केला. ती मायोसिटिस नावाच्या एका दुर्मिळ आजाराशी लढत असल्याचे तिने सांगितले. यातून बरं होण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागतोय असं देखील तिने सांगितलं आहे. मायोसिटिस हा आजार नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊ. मायोसिटिस हा ऑटोइम्यून कंडिशन असलेला आजार आहे. आपल्या शरीरातील मांसपेशींना सूज आल्याने हा आजार होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हा आजार होण्याची शक्यता अधिक असते असंही म्हटलं जातं. मायोसिटिस हा दुर्मिळ आजार असून यात शरीरातील मांस पेशींमध्ये वेदना होणे, दम लागणे, श्वास घेण्यात अडचण येणे अशी लक्षणं दिसून येतात.
व्हायरस, सर्दी, ताप आणि या प्रकारच्या इतर आजारांच्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे हा आजार होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. मायोसिटिसचे पॉलिमायोटिस आणि डर्माटोमायोसिटिस असे दोन प्रकार आहेत. आरोग्य क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे मायोसिटिस या आजारावर अद्याप तरी कोणताही ठोस उपाय नाही. पण नियमित तपासणी, व्यायाम, योगासने आणि इम्युनोसप्रेसेन्ट औषधं याच्या वापराने हा आजार बरा होऊ शकतो. यामुळे आखडलेल्या मांसपेशी मोकळ्या होण्यास मदत होते. तसेच यामुळे मांसपेशी अधिक शक्तीशाली होण्यात मदत होते. मायोसिटिस या आजाराचं निदान झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारावर वेळीच उपचार सुरू झाल्यास त्याची तीव्रता कमी होते.