मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवडणूक आयोगाने अंधेरी पूर्व मतदार संघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली असून, ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. मात्र या निवडणुकीत एक ट्विस्ट आला आहे.
अंधेरी पूर्व मतदार संघातील जागेसाठी निवडणूक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके तर भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांच्यात मुख्य लढत होणार आहे. ६ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र अंधेरी पोटनिवडणुकीत आता एक ट्विस्ट समोर आला आहे. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यासाठी त्यांनी आपल्या पालिकेतील नोकरीचा महिन्याभरापूर्वीच राजीनामा दिला आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेकडून अद्यापही तो मंजूर झालेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक असल्याने ठाकरे गटाची पालिकेत धावाधाव सुरू झाली आहे.
ऋतुजा लटके या महापालिका परिमंडळ उपायुक्तांच्या कार्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा राजीनामा तात्काळ मंजूर व्हावा यासाठी अनिल परब यांनीदेखील पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्यापही त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याने ठाकरे गटापुढील चिंता वाढली आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम..
निवडणुकीच्या नियोजित कार्यक्रमानुसार १४ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रे सादर करणे, १५ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी, १७ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. तर ३ नोव्हेंबर रोजी मतदान, ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी व ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मतदारांची ओळख पटावी म्हणून नेमकी कोणती ओळखपत्रे लागतील, त्याची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.
Andheri Bypoll Election Politics Shivsena Candidate
Uddhav Thackeray Eknath Shinde