नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गंगापूररोडवरील उच्चभ्रू वस्ती असलेल्या रामेश्वर नगर भागात किरकोळ कारणातून एकाच सोसायटीत राहणा-या दोन कुटुंबियात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत महिलांचा विनयभंग करण्यात आला असून याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात परस्परोधी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एका पीडितेने घरात घुसून दांम्पत्यास मारहाण करीत विनयभंग करण्यात आल्याचा तर दुसरीने पती आणि वडिलांना मारहाण करीत विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.
शनिवारी रात्री ही घटना घडली. सोसायटीच्या पार्किंगच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जात असून गंगापूर पोलिस ठाण्यात पहिल्या पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीतील एकाने विनाकारण दरवाजा ठोठावल्याने जाब विचारला असता संशयिताने दांम्पत्यास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत घरात प्रवेश केला. यावेळी संतप्त इसमाने महिलेसह पतीस मारहाण करीत घरातील सामानाची मोडतोड केली. यावेळी मोबाईल,फायरस्टिकचे व पतीच्या गळय़ातील सोनसाखळीचे नुकसान करीत संशयिताने तुम्ही येथे कसे राहतात असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याचे म्हटले आहे. तर दुस-या पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोसायटीच्या पार्किंगमध्ये अस्ताव्यस्त लावलेले वाहन बाजूला घेण्यास सांगितल्याने दोन पुरूष व महिलेने दांम्पत्यास शिवीगाळ करीत काठीने मारहाण केली. यावेळी संशयित महिलेच्या वडिलांनी तुमचे तंगडे तोडतो असे म्हणत दमदाटी केली तर महिलेच्या पतीने गळा आवळून पीडितेचा विनयभंग केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक नितीन पवार करीत आहेत.