नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्याप बरी झालेली नाही. त्यांच्या तब्येतीशी संबंधित काही ताजे अपडेट्स आता समोर आले आहेत. राजू यांचा एमआरआय रिपोर्ट आला असून, त्यात त्यांच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्याचं अहवालात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना बरं होण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात.
राजू श्रीवास्तव यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून डॉक्टरांनी राजू यांचा एमआरआय केला होता. त्यांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी डॉक्टरांचं पथक उपचार करत आहेत. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, १३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता केलेल्या एमआरआयमध्ये राजू श्रीवास्तव यांच्या मेंदूमध्ये काही समस्या असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या मेंदूच्या नसा दाबल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी होण्यासाठी आणखी १० दिवस लागू शकतात. राजू यांच्या भावालाही दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. तसंच राजू यांचे अनेक नातेवाईकही त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले आहेत.
फेक न्यूजकडे दुर्लक्ष करा..
राजू यांच्या प्रकृतीविषयी सोशल मीडियावर चिंता व्यक्त होत आहे. राजू यांची प्रकृती स्थिर असून फेक न्यूजकडे दुर्लक्ष करा अशी विनंती त्यांच्या कुटूंबियांनी केली आहे. राजू यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याविषयी पोस्ट लिहिण्यात आली आहे. “राजू यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. सोशल मीडियावर पसरणाऱ्या फेक न्यूजकडे कृपया दुर्लक्ष करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा”, अशी ही पोस्ट आहे.
पंतप्रधान मोदींनी केली विचारपूस
पंतप्रधान मोदी यांनी राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीला फोन केला होता. मोदींनी राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि मदतीचं आश्वासनही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राजू श्रीवास्तव यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली होती. राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांनीही कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं आहे.
Comedian Raju Shrivastav Health Update MRI Report