अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला शहरात आज संध्याकाळच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे येवला येथील हुडको वसाहतीमध्ये असलेल्या शेवटच्या गल्लीतील रस्त्याला जोडणारा मधला रस्तामध्ये अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक घरात तळ्याचे स्वरूप पहावयास मिळाले. संसार उपयोगी वस्तू पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. घरातील पाणी उपसून काढतांना महिलांची मोठी दमछाक झाल्याचे चित्र या ठिकाणी दिसत होते. वसाहतीमध्ये नगरपालिकेचा रस्ता कच्चा असून सर्वत्र पाणी साठले. पाठीमागील नाल्याला भिंती बांधल्याने पाणी अडकून घरात येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. घरपट्टी पाणीपट्टी व विविध कर नगर पालिकेला भरत असून कुठल्याच प्रकारच्या सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याचे येथील नागरिक सांगतात. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ मार्ग काढण्याची मागणी करण्यात येत आहे.