इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नोएडामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डिझेल प्यायल्याने ८ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. ४ वर्षांच्या मुलीने चुकून आपल्या लहान भावाला पाण्याऐवजी डिझेल पाजले. घरात बाटलीमध्ये डिझेल ठेवलेले होते. या बाटलीत पाणी असल्याचे समजून तिने आपल्या लहान भावाला ते पाजले. नोएडातील छिजारसी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. डिझेल प्यायल्यानंतर काही वेळातच या बाळाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
लव कुश हे आपल्या कुटुंबासह पोलीस स्टेशन सेक्टर-६३ परिसरातील छिजारसी कॉलनीत राहतात. आपल्या घरात एका बाटलीमध्ये त्यांनी डिझेल भरुन ठेवले होते. बुधवारी रात्रीच्या सुमारास ४ वर्षांच्या मुलीने ८ महिन्यांचा भाऊ कृष्णाला पाणी समजून चुकून डिझेल दिले. काही वेळाने मुलाची प्रकृती ढासळत असल्याचे घरच्यांना कळाले. त्यांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले. कुटुंबियांनी मुलाला उपचारासाठी सेक्टर-3 येथील चाईल्ड पीजीआयमध्ये नेले. येथे त्याचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेबाबत मुलाच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात येत आहे. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. तसेच या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
8 months child death due to drink diesel noida crime