मुंबई – केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या अधिकार्यांनी बनावट वस्तू आणि सेवा कर पावत्या बनवणारे रॅकेट उघडकीला आणले आहे. 74 कोटी रुपयांच्या बोगस पावत्यांचा वापर सुमारे 14.4 कोटी रुपयांचे बनावट वस्तू आणि सेवा कर इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) करण्यासाठी केला जात होता. या प्रकरणी, बस्वार कंपनीच्या मालकाला 24.05.2022 रोजी अटक करण्यात आली. त्यानेच या कंपनीची स्थापन केली होती. तर, दुसऱ्या व्यक्तीला 26.07.2022 रोजी अटक करण्यात आली. ही व्यक्ती मालक असल्याचे भासवून बस्वार इंडस्ट्रीजच्या नावाने करंट बँक खाते उघडण्यात गुंतली होती आणि 18 कोटी रुपयांचे बनावट व्यवहार केले होते.
एका विशिष्ट स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत, केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाच्या कर चुकवेगिरी विरोधी शाखेने या आस्थापनाविरुद्ध तपास सुरू केला. तपासादरम्यान घोषित व्यवसाय पत्ता अस्तित्वात नसल्याचा आढळून आले तसेच कोणत्याही व्यावसायिक घडामोड झाली नसल्याचे आढळून आले. तपासात असेही समोर आले आहे की, या आस्थापनाने 7.20 कोटी रुपयांच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता आणि 7.20 कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट पास देखील केले होते.
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या तरतुदींचे घोर उल्लंघन करून, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा किंवा वस्तू न घेता, या कर क्रेडिटचा लाभ घेण्यासाठी आणि पास करण्यासाठी सुमारे 74 कोटी रुपयांच्या बोगस पावत्या तयार करण्यात आल्या होत्या. या कर फसवणुकीत 126 पेक्षा जास्त व्यावसायिक संस्थांचे जाळे कार्यरत आहे, जे दिल्ली, अहमदाबाद, राजकोट, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांसह अनेक राज्यात पसरलेले आहे.
तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्याच्या आधारे आणि या कर फसवणुकीत त्याच्या भूमिकेची कबुली देणाऱ्या, आरोपी व्यक्तीला 26.07.2022 रोजी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली. आरोपीला माननीय अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लेनेड यांच्यासमोर हजर करण्यात आले. दंडाधिकाऱ्यांनी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पुढील तपास आणि कर वसुलीची कारवाई सुरू आहे.
हे प्रकरण केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या मुंबई क्षेत्रात कर फसवणूक करणारे आणि बनावट ITC नेटवर्कच्या विरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेचा एक भाग आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या भिवंडी आयुक्तालयाने गेल्या वर्षभरात केलेली ही 9 वी अटक आहे. संभाव्य फसवणूक करणार्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकारी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिकारी, करचोरी करणाऱ्यांविरुद्धची ही मोहीम येत्या काही दिवसांत अधिक तीव्र करणार आहेत.