इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – खोट्या कागदपत्रांच्या आधारे व्हिसा बनवून कॅनडा येथे उच्च शिक्षणासाठी गेलेल्या सातशे भारतीय विद्यार्थ्यांवर तेथील शिक्षण अर्धवट सोडून स्वगृही परतण्याची नामुष्की ओढवली आहे.
जालंधर येथील ब्रिजेश मिश्रा नावाच्या ट्रॅव्हल एजंटद्वारे व्हिसासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. यासाठी मिश्राने प्रत्येक विद्यार्थ्याकडून १६ लाख रुपये घेतले. त्यामध्ये कॅनडा येथील हंबर महाविद्यालयाचे प्रवेश शुल्क आणि तिथे राहण्याच्या खर्चाचा समावेश होता. प्रवेश प्रक्रिया करून हे सर्व विद्यार्थी २०१८-१९ साली कॅनडामध्ये शिक्षणासाठी गेले. मात्र, कॅनडामध्ये कायमस्वरुपी रहिवासी दाखल्यासाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यातील आली. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी व्हिसासाठी दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे निष्पन्न झाले. तेथे गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण झाले असून त्यांनी कॅनडात कॅनडात काम करण्याचा परवानाही प्राप्त केला आहे. कॅनडामध्ये अशा प्रकारचा घोटाळा पहिल्यांदाच पुढे आला आहे. याचा परिणाम इतर व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या इतर भारतीयांवर होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची कॅनडालाच का पसंती?
परदेशातील इतर देशांच्या तुलनेत परदेशी विद्यार्थ्यांसाठी कॅनडामध्ये अभ्यास आणि राहण्याचा खर्च खूपच कमी आहे. येथे कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळते. कॅनडामधील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठीची फी अमेरिका आणि इंग्लंडसारख्या देशांतील प्रसिद्ध खाजगी विद्यापीठात शिकण्याच्या शुल्काच्या तुलनेत जवळपास निम्मी आहे. कॅनडामध्ये अभ्यास करण्यासाठी अनेक प्रसिद्ध विद्यापीठे आणि अभ्यासक्रम आहेत, तसेच पात्र विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देखील उपलब्ध आहे. चांगल्या विद्यार्थ्यांसाठी, कॅनडातील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेणे भारतातील अनेक प्रसिद्ध महाविद्यालयांपेक्षा स्वस्त आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडाला पसंती आहे.
700 Indian Students will Return from Canada