मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई सीमा शुल्क विभाग -3 च्या वतीने आज नवी मुंबईतील तळोजा येथे असलेल्या मेसर्स मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (एमडब्ल्यूएमएल) च्या ज्वलन सुविधास्थानी 140.57 किलोंचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत 538 कोटी रूपये आहे. या संदर्भात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचा तपशील देताना, विभाग-3 चे मुख्य आयुक्त, राजेश सानन यांनी सांगितले की, नष्ट केलेली औषधे विभाग -3 अंतर्गत कार्यरत असलेल्या तीन आयुक्तालयांनी जप्त केली आहेत. जप्तीच्या कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1. मुंबई विमानतळ आयुक्तालयाने 14 प्रकरणांमध्ये 56.06 किलो हेरॉईन आणि 33.81 किलो चरस जप्त केला आहे.
2. एअर कार्गो निर्यात आयुक्तालयाकडे दाखल केलेल्या गुन्ह्यात 21.70किलो चरस जप्त केले.
3. डीआरआयने एका प्रकरणात 29 किलो हेरॉईन जप्त केले, तर मुंबई सीमा शुल्क विभाग-3 च्या प्रतिबंधात्मक आयुक्तालयाने हा माल नष्ट केला.
सीमाशुल्क कायदा, 1962 च्या तरतुदींनुसार बंदी असलेले अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक म्हणजेच मनावर परिणाम करणारे पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्ती अवैध कृत्य करीत असल्याचे मानले जाते. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या कलम 8 अन्वये गुन्ह्यानुसार दोषी आहेत. तसेच या कायद्यातील कलम 21, कलम 23 आणि एनडीपीएस अधिनियम 1985 मधील कलम 29 नुसार शिक्षेस पात्र आहेत.
सीमा शुल्क अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अंमली पदार्थ जप्तीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की; अंमल पदार्थांची तस्करी प्रामुख्याने केनिया, युगांडा, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांतील नागरिकांकडून केली जाते. सामानामध्ये खास यासाठी गुप्त कप्पे बनवून त्यामध्ये हे अंमली पदार्थ लपवून त्यांची तस्करी केली जाते. तसेच प्रवाशानेही अशा पदार्थाचे सेवन केलेले असते, असे आढळले आहे. मुंबई विमानतळ सीमा शुल्क विभागाने अंमली पदार्थांची होणारी अवैध वाहतूक शोधण्यासाठी ‘स्निफर डॉग’चा प्रभावीपणे वापर केला आहे.
जप्त केलेल्या अंमली पदार्थांना जाळून नष्ट करणे आवश्यक असले तरीही ते पर्यावरणाच्या दृष्टीने हानीकारक आहे. त्यामुळे असे पदार्थ जाळून भस्मसात करण्यासाठी प्रमाणित प्रदूषण नियंत्रण उपकरणे बसवलेल्या ’इन्सिनरेटर्स’ मध्ये करणे आवश्यक आहे.