इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २७ पर्यंटकांचा मृत्यू झाला. त्यात महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे. यात हल्ल्यात दिलीप डिसले आणि अतुल मोने हे महाराष्ट्रातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी घटनेचा निषेध केला आहे. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील २ जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे.
या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे यांना काश्मिरमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात गोळ्या लागल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या पत्नी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या पुण्यातील परिवारजनांशी मी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि त्यांना राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या हल्ल्याच्या क्षणी एक नागपूरकर कुटुंब सुद्धा तेथे होते. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरुन उड्या मारल्या आणि त्यात घसरुन सिमरन रुपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांच्यासमवेत तिलक आणि गर्व रुपचंदानी हे सुद्धा आहेत. तिघेही सुखरुप आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला असून, त्यांना सर्व ती मदत पुरविण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.