निलेश गौतम, इंडिया दर्पण वृत्तसेवा
अतिशय शक्तीशाली आणि भारतीयांसाठी जिवनावश्यक बनलेल्या व्हॉटसअॅपला आता सायबर चोरट्यांनी आपले लक्ष्य बनवले आहे. त्यामुळे या माध्यमातून ते आता अनेकांना कॉल करीत आहेत. तब्बल २५ लाखांची बतावणी करुन मोठी आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांपासून चार हात लांब राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ऑनलाइन फसवणुकीचे नव नवीनअजेंडा घेऊन सायबर चोरी करणारे रोजच नवीन शक्कल लढवत आहेत. याद्वारे सर्वसामान्यांना ऑनलाइन फसविण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढतच आहेत. सध्या व्हॉट्सअप वर एक स्टिकर आणि एक ऑडीओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यात म्हटले आहे की तुम्हाला 25 लाखांची लॉटरी लागली आहे आणि आम्ही तुम्हाला मुंबई येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मॅनेजरचा मोबाईल नंबर पाठविला आहे. तो नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून व्हॉट्सअॅप कॉल करा. विशेष म्हणजे साधा कॉल नाही तर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनच कॉल करण्याचे आवर्जून सांगण्यात येत आहे.
ऑडीओ बरोबर पाठविलेल्या जाहिरात स्टिकरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योगपती मुकेश अंबानी, यांच्यातसह कौन बनेगा करोडपतीचे स्टिकर आणि बीग बी अभिताभ बच्चन यांचाही फोटो आहे. यात सरळ सरळ देशातल्या सर्वात मोठ्या बँकेच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या आमिषाला अनेक जण भुलल्याचे सांगितले जात आहे. व्हॉटसअॅप काॉल रेकॉर्ड होत नसल्याने भामट्यांनी आता हा फंडा वापरण्यास सुरुवात केली आहे. याद्वारे मोठी आर्थिक फवणूक होण्याची चिन्हे असल्याने सायबर तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिला आहे.