मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ने २ हजार रुपयांची नोट बंद करण्याचा निर्णय घेतला. स्वच्छ नोट धोरणाअंतर्गत हा मोठा निर्णय घेतल्याचे बँकेने सांगितले आहे. मात्र, या नोटा काही काळासाठी वैध राहिल्या. या नोटांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर जवळपास साडेसहा वर्षांनी हा निर्णय का घेतला असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याची काही प्रमुख कारणे आहेत.
१. उद्देश
RBI ने नोव्हेंबर २०१६ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जारी केल्या. RBI कायदा १९३४ च्या कलम २४ (१) अंतर्गत जारी करण्यात आले होते. नोटाबंदीच्या काळात काढण्यात आलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या चलनाचा बाजार आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
२. नोटांची मर्यादा
RBIच्या म्हणण्यानुसार, २ हजार रुपयांच्या सुमारे ८९ % नोटा मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आल्या होत्या. या नोटांनी त्यांचे चार-पाच वर्षांचे शेल्फ लाइफ ओलांडले आहे किंवा ओलांडणार आहेत.
३. चलनात अत्यल्प
३१ मार्च २०१८ पर्यंत ६.७३ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. म्हणजेच एकूण नोटांमध्ये त्यांचा वाटा ३७.३% होता. ३१ मार्च २०२३ पर्यंत हा आकडा ३.६२ लाख कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच चलनात असलेल्या एकूण नोटांमध्ये २ हजार रुपयांच्या फक्त १०.८% नोटा शिल्लक होत्या.
४. छपाईही बंद
नोटाबंदीनंतर दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या. बँकांमध्ये इतर मूल्यांच्या नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्या, तेव्हा दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणण्याचा उद्देशही पूर्ण झाला. त्यामुळे २०१८ मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाईही बंद करण्यात आली होती.
५. कमी वापर
RBIच्या म्हणण्यानुसार, २ हजार रुपयांच्या नोटांचा व्यवहारात फारसा वापर केला जात नाही. याव्यतिरिक्त, इतर मूल्यांच्या नोटा देखील सामान्य लोकांसाठी पुरेशा चलनात अस्तित्वात आहेत. त्यामुळे आरबीआयच्या स्वच्छ नोट धोरणांतर्गत २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2 Thousand Notes RBI Demonetization Reasons