नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून ज्याची सर्वात मोठी भीती होती ती अखेर खरी ठरली आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या अवताराने भारतात शिरकाव केला आहे. तशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. ओमिक्रॉन हा अतिशय घातक आणि वेगाने पसरणारा असल्याने जगभरातच चिंतेचे वातावरण आहे. आता याचे रुग्ण भारतात सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकमधील दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले आहे. या बाधित दोघांवर सध्या उपचार सुरू आहेत. यातील एक जण ११ नोव्हेंबरला तर दुसरा २० नोव्हेंबरला भारतात दाखल झाला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू झाले. याचदरम्यान त्यांची ओमिक्रॉनची चाचणीही करण्यात आली. ती सुद्धा पॉझिटिव्ह आली. हे दोन्ही रुग्ण पुरुष असून एकाचे वय ६४ तर दुसऱ्याचे ४४ वर्षे आहे. या दोघांनाही कोरोनाची अतिशय सौम्य लक्षणे होती. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज नसली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1466362949006626821?s=20
जगभरात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. आता बाधित झालेल्यांची संख्या लक्षणीय वाढत आहे. तसेच, आतापर्यंत दोन डझनहून अधिक देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडल्याचे चिंता व्यक्त होत आहे. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने योग्य ती खबरदारी घेण्याचे सूचित केले आहे. त्याचे पालन न केल्यास कोरोनाचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.