नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने (उत्तर विभाग) रियल स्पोर्ट्स इंडिया, स्थानिक प्रशासन आणि अमेझिंग भदेरवाह टुरिझम असोसिएशन (ABTA) यांच्या संयुक्त विद्यमाने २६ फेब्रुवारी रोजी जम्मूतील भदेरवाह येथे पहिली स्नो मॅरेथॉन आयोजित केली होती. या पहिल्या जम्मू स्नो रन सफारीला डोडा शहराचे जिल्हा दंडाधिकारी तसेच उपायुक्त विशेष महाजन यांच्या हस्ते झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
देशभरातील प्रवासी, साहसी आणि उत्साही लोकांमध्ये मॅरेथॉन साहसाची भावना वाढवण्यासाठी तसेच भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे, भारताचे जी २० अध्यक्षपद साजरे करताना, देखो अपना देश, युवा पर्यटन क्लब आणि फिट इंडिया मूव्हमेंट या उपक्रमांना चालना देण्यासाठी या पहिल्या भव्य स्नो मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विकास परिषद, जिल्हा प्रशासन, भारतीय सेना दल, जम्मू विद्यापीठचा भदरवाह परिसर यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वपूर्ण योगदान दिले. या मॅरेथॉनमध्ये अनेक शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा/ महाविद्यालय व्यवस्थापन यांनाही प्रेक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. शालेय/ महाविद्यालयीन शिक्षक/ व्याख्यात्यांना युवा पर्यटन क्लब तयार करण्यासाठी आणि तरुणांच्या सक्रिय सहभागातून पर्यटनाला चालना देण्यासाठी आवश्यक माहिती देखील देण्यात आली.
या मॅरेथॉनमध्ये देशभरातून १३० धावपटू सहभागी झाले होते. गुलदंडा येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली. या सहभागींना ५ किमी, १० किमी आणि २५ किमी धावण्याचा पर्याय देण्यात आला होता. बर्फाच्छादित भदरवाहचा चित्ताकर्षक परिसर डोळ्यांना सुखावणारा आणि आनंद देणारा होता. सहभागींना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पर्यटन मंत्रालय येत्या काही वर्षांत असे अनेक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करेल अशी अपेक्षा करत आहे.