विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पाकिस्तानच्या तुरुंगात बंद भारतीय कैद्यांवर आजवर अनेक चित्रपट आले. कधी लव्हस्टोरी, तर कधी देशप्रेम दाखविण्यात आले. मात्र आजही एक कहाणी अधुरीच आहे. कारण पाकिस्तानाच्या तुरुंगात बंद असलेल्या १७ मनोरुग्ण कैद्यांचा भारतात कोण वाली आहे, हे अद्याप कळू शकलेले नाही. हे कैदी पूर्णपणे मनोरुग्ण नसून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहेत, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना कुटुंबातील कुणीतरी ओळखेल अशी आशा आहे.
पाकिस्तानने सहा वर्षांपूर्वी त्यांच्या तुरुंगात १७ भारतीय बंद असल्याचे सांगितले होते. त्यांची ओळख पटवण्यासाठी पाकिस्तानकडून आणि भारताकडून मोठे प्रयत्न झाले. परंतु, त्याला यश मिळू शकले नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने या सर्व कैद्यांची छायाचित्रे आपल्या संकेतस्थळावरसुद्धा टाकली आहेत. त्यानंतर केंद्रशासीत प्रदेश व राज्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मदतही मागितली होती.
आजही केंद्राच्या वतीने त्यासाठी प्रयत्न थांबलेले नाबही. या कैद्यांनी त्यांची शिक्षा पूर्ण केलेली आहे. मात्र राष्ट्रीयता सिद्ध न झाल्यामुळे त्यांना भारतात आणणे शक्य नाही, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या कारागृहात असलेल्या या कैद्यांची भारतीय असल्याचीच ओळख मानली जाते. यात चार महिलांचाही समावेश आहे.
पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी या महिलांना गुल्लू जान, अजमिरा, नाकाया आणि हसिना अशी नावे दिली आहेत. तर इतर कैद्यांमध्ये सोनू सिंह, सुरिंदर महतो, प्रल्हाद सिंह, सिलरोफ सलीम, बिरजू, राजू, बिपला, रुपी पाल, पनवासी लाल, राजू माहोली, श्याम सुंदर, रमेश आणि राजू राय यांचा समावेश आहे. पाकिस्तानने २०१५ मध्ये या १७ कैद्यांच्या बाबतीत माहिती दिली होती. तसेच इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्ताला या कैद्यांशी संपर्क साधण्याची संधीही दिली होती. मात्र, त्यालाही यश मिळाले नाही.
केंद्रीय गृह मंत्रालयाचे आवाहन
या कैद्यांपैकी कुणालाही ओळखणारी व्यक्ती देशात असेल तर त्यांनी मंत्रालयात अवर सचिव, राज्य सरकार किंवा केंद्र शासीत प्रदेशाच्या गृह विभागाला कळवावे. तेही शक्य नसेल तर पोलीस महासंचालक, पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्त यांनाही सांगितले तरीही चालणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.