विशेष प्रतिनिधी, मुंबई
इयत्ता दहावाची परीक्षा न घेता त्यांचे मूल्यमापन करुन निकाल दिला जाणार आहे. मात्र, ११वीची प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाईल, याची स्पष्टता करण्यात आली आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
गाडकवाड म्हणाल्या की, विविध परीक्षा मंडळानी या वर्षीच्या इ. १० वीच्या निकालासाठी शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन विचारात घेतल्याने इ. ११ वी प्रवेशासाठी एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी आम्ही इ. ११ वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET घेणार आहोत. ही प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ.१० वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. एकूण १०० गुणांच्या परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील व OMR पद्धतीने दोन तासांची परीक्षा घेण्यात येईल.
इ. ११ वी प्रवेश परीक्षा राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहिलेल्या जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना इ. १० वी च्या मूल्यमापन पद्धतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येईल, असेही शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी सांगितले आहे.