सोन्याच्या दरात घट तर तेलाच्या दरात वाढ; हे आहे कारण

विशेष प्रतिनिधी, मुंबई
 अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नातील वाढीमुळे सोन्यावर दबाव आला तर वाढीव मागणीच्या संकेतांमुळे तेलात सुधारणा दिसून आली असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
सोने: कालच्या व्यापारी सत्रात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाल्याने स्पॉट गोल्डच्या दरात घसरण होऊन ते १८९६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. यामुळे त्वरीत उत्पन्न न देणाऱ्या सोन्याचे आकर्षण कमी झाले. अमेरिकी फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांनी अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्याबाबत आशावाद दर्शवल्यामुळे सध्याच्या किंमतीत तेजी आहे. त्यामुळे महागाईवर उतारा समजल्या जाणाऱ्या सोन्याचे दर काहीसे कमी झाले.
तसेच अमेरिकेतील बेरोजगारीचे दावे अपेक्षेपेक्षा कमी आल्याने अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या गतिमानतेच्या चर्चांना आधार मिळाला. शुक्रवारनंतरच्या अमेरिकेच्या चलनवाढीची आकडेवारीवर बाजाराचे बारकाईने लक्ष आहे. तथापि, अमेरिकन फेडने सोयीस्कर भूमिका घेतल्याने तसेच भारतातील वाढत्या विषाणू संसर्गाच्या घटनांमुळे सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आधार मिळाला.
कच्चे तेल: कालच्या व्यापारी सत्रात डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १ टक्क्यांनी वाढले आणि ते ६६.९ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. अमेरिकी आर्थिक आकडेवारीच्या आधारामुळे, भारताकडून कमी मागणीची चिंता काहीशी कमी झाली. त्यामुळे तेलाचे दर घसरले. अमेरिकेचे बेरोजगारीचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त घटल्यामुळे अमेरिका आणि युरोपसारख्या प्रमुख अर्थव्ययवस्थांकडून मोठ्या मागणीची चर्चा, घटता अमेरिकी क्रूड साठा यामुळे बाजार भावनांना सातत्याने आधार मिळाला.
एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार मागील आठवड्यात अमेरिकी क्रूडच्या यादीत १.७ दशलक्ष बॅरलची घसरण झाली. त्यामुळे तेलाच्या दरांना आणखी आधार मिळाला. जागतिक तेलबाजारात इराणी तेलाच्या पुरवठ्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यातील आण्विक करारातील घडामोडींवरही बाजाराचे लक्ष आहे. गुंतवणूकदारांना, पुढील महिन्यात १ जून २०२१ रोजीच्या ओपेक बैठकीचीही आशा आहे. पुढील महिन्यातील त्यांच्या उत्पादनासंबंधी स्थितीबाबत यातून काही संकेत मिळतील.