वॉशिंग्टन – एका घरात आई-वडिलांचे मृतदेह पडलेले आहेत आणि ४ वर्षांची त्यांची मुलगी बाल्कनीत एकसारखी रडत आहे, असे हृदय पिळवटून टाकणारे चित्र अमेरिकेतील न्यू जर्सीत दिसले. एका भारतीय दाम्पत्याबाबत हे घटले असून मृत महिला ही गर्भवती असल्याचेही समोर आले आहे. बाल्कनीतील मुलीच्या रडण्यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. या दाम्पत्याचा धारधार शस्त्राने वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे काही अमेरिकी माध्यमांनी सांगितले आहे. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बालाजी भारत रुद्रवार (३२) आणि त्यांची पत्नी आरती बालाजी रुद्रवार (३०) न्यू जर्सी येथील नॉर्थ अर्लिंग्टन बोरोच्या २१ गार्डन टेरेस अपार्टमेंटमध्ये राहात होते. या परिसरात १५ हजारांहून अधिक लोक राहतात. याच अपार्टमेंटमध्ये त्यांचे मृतदेह आढळले.
बालाजी यांचे वडील भारत रुद्रवार यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले, की बुधवारी शेजाऱ्यांनी बाल्कनीत मुलीला रडताना बघितले. त्यानंतर लगेचच पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिसांनी घर उडल्यावर दोघांचे मृतदेह आढळले. दाम्पत्याच्या मृत्यूचे कारण आणि परिस्थितीची माहिती मिळवण्यासाठी वैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. दरम्यान, चाकूने वार झाल्याची पुष्टी झाली आहे.
मृताचे वडील म्हणाले की, स्थानिक पोलिसांनी गुरुवारी आम्हाला याची माहिती दिली. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिस मृत्यूचे कारण स्पष्ट करतील. आमची सून सात महिन्यांची गर्भवती होती. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. पुन्हा त्यांच्यासोबत राहण्यासाठी आम्ही अमेरिकेला जाणार होतो. दोघेही आनंदाने राहात होते. त्यांचे शेजारीसुद्धा खूप चांगले आहेत. आमची नात सध्या मुलाच्या मित्राच्या घरी आहे. तिथल्या भारतीय समुदायात त्याचे अनेक मित्र होते. आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेहांना भारतात पोहोचवण्यासाठी किमान ८ ते १० दिवस लागतील, असे पोलिस अधिकाऱ्यांनी कळविल्याचे त्यांच्या वडिलांनी सांगितले.