नाशिक – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षी शहरात विजयादशमीला निघणारे पथसंचलन रद्द करण्यात आले आहे, तशी माहिती नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे यांनी दिली आहे. त्याचबरोबर विविध ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने शस्त्रपूजन कार्यक्रम होणार असून त्यात बौद्धिक वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ९५ वर्षात प्रथमच पथसंचलन रद्द झाले आहे.
चंद्रात्रे यांनी सांगितले की, नाशिक शहरात करोना प्रसार रोखण्याकरिता सुरक्षित अंतर ठेवणे,मास्क वापर इत्यादी बाबत जागरूकता व्हावी यासाठी रा.स्व.संघ प्रशासनासोबत सहभागी आहे. तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे गरजुंना जेवण डबे व अन्नधान्य पुरवठा, स्थलांतरिताना सहाय्य, वस्तीमधील करोना तपासणी अभियान , प्रतिबंधक उपाययोजना, मदत कार्य, रक्तदान शिबिरे इत्यादीचे प्रभावी आयोजन करीत आहे.
चंद्रात्रे म्हणाले की, शहरात कोविड बाधितांसाठी दीपस्तंभ – एक आशेचा किरण हा उपक्रम प्रभावीपणे कार्यरत झाला आहे. दीपस्तंभ या हेल्पलाईन सेंटरवरुन नाशिक शहरातील लोकांसाठी कोव्हिड बाधितांना निरनिराळ्या भागातील चाचणी केंद्र, हॉस्पिटल्स, आॕक्सिजन व कार्डिॲक ॲम्ब्यूलन्स, कोविड कीट देणारे औषध विक्रेते, कोव्हिड बाधित घरातील कचरा संबंधित घंटागाडी मोबाइल क्रमांक, त्या त्या भागातील डबेवाले आणि मेस ह्यांचे पत्ते अशी विविध माहिती देऊन त्यांचा ताण कमी करण्याचे काम केले जाते. घरात फक्त वृद्ध असतील तर अशा ठिकाणी प्रसंगी स्वयंसेवक त्यांना औषधे, किराणा आणून देण्याची सोय करणे असे काम करत आहेत. त्याच प्रमाणे ह्या कोव्हिड हेल्पलाईन सेंटरवरुन रुग्णांच्या मनातील करोनाची भीती काढण्यासाठी समुपदेशनही केले जाते. हे कोव्हिड हेल्पलाईन सेंटर दररोज सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत कार्यरत आहे.या सर्व कार्यक्रमामध्ये विविध वयोगटातील बाल, तरुण, माता भगिनी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असून या उपक्रमांना उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. रविवारी २५ ऑक्टो रोजी सकाळी ८ वाजता नागपूर येथील संघ मुख्यालयात विजयादशमी निमित्ताने साजरा होणार ऑनलाईन उत्सव व सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांचे भाषण सर्व समाजाने सहकुटुंब पाहावे व ऐकावे असे आवाहनही चंद्रात्रे यांनी केले आहे.