नवी दिल्ली – शिक्षक दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने केली आहे. त्यात राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नारायण चंद्रकांत मंगलराम आणि मुंबईतील संगीता सोहनी या दोन शिक्षकांना या पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या चेडगावच्या गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेत मंगलराम हे शिक्षक आहेत. तर, मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्राच्या शाळेत सोहनी या शिक्षिका आहेत. दोघांचे कार्यही सर्वोत्कृष्ट असून त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. अवांतर उपक्रम आणि शिकविण्याच्या पद्धतीला नवा आयाम या दोन्ही शिक्षकांनी दिला आहे. त्यामुळे ते या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. देशभरातून ४७ शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.