मुंबई – राजधानी मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. मुंबईत अवघ्या चार तासांमध्ये ३०० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत सखल भागात पाणी भरले असून, गांधी मार्केट माटुंगा, हिंदमाता, बीपीटी कॉलनी,चेंबूर रेल्वे स्थानक, पोस्टल कॉलनी चेंबूर या भागात अजूनही पाण्याचा निचरा झाला नसल्याने या भागातली वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरची वाहतूक सुरू आहे.
रायगड जिल्हयात गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्याती सर्व नद्यांना पूर आला असून नदी काठावरच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस पडत असून जगबुडी आणि बावनदी या दोन नद्यांनी धोक्यााची पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी तालुक्यात बावनदीचे पाणी पुलावरून वाहू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक सकाळपासून बंद करण्यात आली आहे. वाशिष्ठी, काजळी आणि कोदवली या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहू लागल्या आहेत. त्यामुळे चिपळूण आणि राजापूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे.