नाशिक – देवळाली ते भुसावळ दरम्यान मेमू लोकल लवकरच धावणार आहे. तशी माहिती भुसावळ मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी दिली आहे. त्यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत विविध बाबींची माहिती दिली.
लॉकडाऊन संपल्यानंतर मेमू लोकल धावेल, असे ते म्हणाले. त्यामुळे भुसावळ-देवळाली पॅसेंजर बंद होणार आहे. राज्य सरकारने परवानगी दिल्यास रेल्वे प्रशासन पंचवटी एक्स्प्रेस सुरु करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी ग्वाही गुप्ता यांनी दिली. कल्याण ते भुसावळपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे लाईनचे काम वेगाने सुरु असून तिसरी लाईन लवकरच तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बुकींग ऑफिस राहणार
शहरातील तिबेटियन मार्केट येथील रेल्वे तिकीट बुकींग ऑफिस सुरू राहणार असल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले आहे. हे ऑफिस महापालिकेच्या इमारतीत आहे. महापालिकेने भाडे दरवाढ केली आहे. हे भाडे रेल्वेला परडवत नसल्याने हे कार्यालय बंद करण्यासाठी हालचाली सुरु होत्या. रेल्वेने याबाबत महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी भाडे दरवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. हे कार्यालय बंद होणार नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले आहे.