नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सन २०२३ च्या शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार, ज्ञानदीप पुरस्कार, रुख्मिणी पुरस्कार व बाबुराव बागुल कथा पुरस्कार अशा चार पुरस्कार विजेत्यांची निवड प्रक्रिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी गठीत केलेल्या समितीने पूर्ण केली. कुलसचिव दिलीप भरड व विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र प्रमुख डॉ. दयाराम पवार यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली.
त्यानुसार शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार हा यवतमाळ जिल्ह्यातील प्रा. डॉ. तक्षशिला हरगोविंद्र मोटघरे यांना जाहीर करण्यात आला. ज्ञानदीप पुरस्कारासाठी कोल्हापुरचे डॉ. संजय भीमाशंकर रत्नपारखी यांची निवड करण्यात आली. रुख्मिणी पुरस्काराने बदलापुर (ठाणे) येथील श्रीमती दिपा प्रवार यांना गौरवण्यात येणार आहे. तसेच बाबुराव बागुल कथा पुरस्कार हा श्री. विवेक वसंत कुडू (पालघर) यांच्या ‘चार चपटे मासे’ या कथा संग्रहास घोषित करण्यात येत आहे. उपरोक्त पुरस्कारासाठी प्रत्येकी २१ हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे स्वरूप आहे. लवकरच एका जाहीर समारंभाद्वारे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहिःशाल केंद्राच्या माध्यमातून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.
विद्यापीठातर्फे सन १९९६ पासून दरवर्षी नवोदित कथालेखकांना बाबुराव बागुल कथा पुरस्कार प्रदान करण्यास सुरुवात झाली. सन २००० पासून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाच्या स्त्रीला रुख्मिणी पुरस्कार देण्यात येवू लागला, तर सन २००३ पासून पारंपारिक शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव काम करणाच्या व्यक्तीस किवा संस्थेस शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार तर दूरशिक्षण क्षेत्रात भरीव्र काम करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस ज्ञानदीप पुरस्कार देवून गौरवण्यात येते. त्यानुसार सन २०२३ च्या या पुरस्कारांसाठी विद्यापीठातर्फे पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त ४१ अर्जांची छाननी करून निवड समितीने अंतिम चार पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.