चीनची कोंडी
नियंत्रणरेषेवर चिनी सैन्याची कोंडी झाल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चीनकडून परस्परविरोधी संकेत मिळत आहेत. कैलास पर्वत श्रेणीतील अनेक शिखरे ताब्यात घेतल्यामुळे चर्चेत घासाघीस करण्याची चीनची क्षमता आता संपली आहे.
नियंत्रण रेषेपलीकडील चिनी क्षेत्रात भारताने आक्रमण करून सात चिनी ठिकाणे काबिज केल्याची माहिती एका वृत्तपत्राने भारतीय लष्कराच्या अनामिक अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळेही चीनची अधिकच कोंडी झाली असावी. परिणामी, भारताने आपले रणगाडे आणि तोफा रणक्षेत्रातून काढून घेतल्यास आपल्याही तोफा व रणगाडे काढून घेण्याची तसेच भारताने चुशुल क्षेत्रातून सैन्य काढून घेतल्यास आपले सैन्य मागे घेण्याची तयारी चीनने कोअर कमांडर पातळीवरील चर्चेच्या सातव्या फेरीत दर्शविली आहे, असेही वृत्त आहे.
मग प्रश्न असा उपस्थित होतो की, तिकडे अध्यक्ष शी जिनपिंग लष्कराला युद्धसाठी सज्ज राहण्याचे आवाहन करीत आहेत, ते कशासाठी आणि पूर्व लडाखमध्ये काही ठिकाणी चिनी लष्कर तोफेतून सोडण्यात येणारे भूसुरंग पेरीत आहे, ते कशासाठी?
भारतीय सैन्य ज्या भागातून चिनी ठाण्यांवर हल्ला करण्याची शक्यता वाटते त्या भागात चिनी सैनिक तोफेतून फेकले जाणारे सुरुंग पेरीत आहे. हे सुरुंग ठराविक काळ जमिनीखाली राहतात. सैनिकाने त्यावर पाऊल ठेवल्यास त्याचा स्फोट होतो किवा तो तसाच जमिनीत राहिल्यास विशिष्ट कालावधीत त्याचा स्फोट होऊन तो आपोआपच नष्ट होतो. थोडक्यात लडाखच्या थंडीत चिनी सैन्य हवालदिल झाले आहे आणि नजिकच्या काळात काही तोडगा निघाला नाही तर भारतीय सैन्याऐवजी थंडीच चिनी सैनिकांचा बळी घेण्याची शक्यता अधिक दिसते आहे.
हा सगळा दबाव चीनवर असतानाच भारतीय लष्कराचे उपप्रमुख ले. जनरल एस. के. सैनी हे संरक्षण प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चार दिवसांच्या दौऱ्यावर काल अमेरिकेला गेले आहेत. ते हवाई येथील अमेरिकन लष्कराच्या इंडोपॅसिफिक कमांडलाही भेट देणार आहेत. शिवाय २६-२७ ऑक्टोबरला भारत अमेरिका यांची २+२ बैठक होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चीनचे लडाखमधील गणित बिघडत चालले आहे. त्यामुळे भारत चीनच्या अटींवर सैन्य अथवा रणागडे, तोफा मागे घेण्याची अजिबात शक्यता नाही. चीनपुढे आता दोनच पर्याय आहेत, एकतर त्याने युद्धकरून आपले हेतू साध्य करावेत किवा स्वत:हून एप्रिलपूर्व ठिकाणी आपले सैन्य व युद्धसामुग्री नेऊन ठेवावी. अर्थात यातले काहीही करण्याऐवजी चीन चर्चेचे नाटक चालू ठेवील.
आता लवकरच कोअर कमांडर पातळीवरची चर्चेची आठवी फेरीही होणार आहे. अमेरिकेची निवडणूक होऊन अध्यक्षपदी कोण येते हे स्पष्ट झाल्यावरच लडाखमधील स्थिती अधिक स्पष्ट होईल. अध्यक्षपदी बायडेन आल्यास ते चीनविषयी मवाळ धोरण अवलंबतील असे चीनला वाटते. पण अमेरिकेच्या धोरणात फार मोठा बदल होण्याची शक्यता कमी मानली जाते.
विशेषत: चीनला आवर घालण्यासाठी भारताशी सहकार्य करण्याचे अमेरिकेचे सर्वमान्य धोरण गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भारतच या धोरणाला आजवर नकार देत आला होता, पण आता चीननेच भारताला अमेरिकेकडे ढकलून आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. अर्थात चीनविरुद्ध भारताचे युद्ध लढण्यासाठी अमेरिका येणार नाही व भारतची ती अपेक्षाही नाही. हे युद्ध भारताला आपल्या बळावर लढावे लागेल. पण आता भारत व अमेरिका यांच्यातील संरक्षण सहकार्यामुळे भारताला अमेरिकेकडून काही आवश्यक संरक्षण तंत्रज्ञान व साधनसामु्रग्री मिळण्याचा मार्ग सोपा होईल. त्यामुळे चीनची स्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे.